। कुवैत । वृत्तसंस्था ।
मंगाफ शहरात बुधवारी (दि.12) सकाळी वसाहत इमारतीला आग लागण्याची मोठी दुर्घटना घडली. या आगीत 41 जणांचा बळी गेला असून 40 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 10 भारतीय नागरिकांचा समावेश होता. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, बुधवारी सकाळी दक्षिण कुवैतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीत आग लागली. या इमारतीत भारतासह आशियातून आलेल्या मजुरांचं वास्तव्य आहे. या इमरातीला आग लागून येथे राहणार्या 41 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 40 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मेजर जनरल रशीद हमद म्हणाले, स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता आम्हाला या आगीच्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही त्वरित ही माहिती अग्निशमन दलासह संबंधित अधिकार्यांना दिली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका घरातील स्वयंपाकघरात आग लागली आणि ती आग काही मिनिटात संपूर्ण इमारतीत पसरली. इमारतीतल्या ज्या घरात आग लागली त्या घरात केरळमधील एक व्यक्ती वास्तव्यास होती. या इमारतीत राहणारे बहुसंख्य लोक दक्षिण भारतीय नागरिक आहेत. तसेच या आगीत मृत्यू झालेल्या 10 भारतीयांपैकी पाच जण मूळचे केरळचे रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुवैतचे उपपंतप्रधान फहद युसुफ अल सबा यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
कुवैतमध्ये इमारतीला आग; 41 बळी
