संतापजनक! पनवेलच्या भाजप नेत्याची कर्जतमध्ये गुंडगिरी

। नेरळ । प्रतिनिधी ।
पनवेल मनपाचे माजी उपमहापौर, भाजप नेते जगदीश गायकवाड यांनी आपल्या सहकार्‍यांसह कर्जत येथील युवकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात तिघेजणे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तालुक्यातील तांबस येथील सुशील देवराम जाधव हे आपल्या मित्रांसह आले असता त्यांच्यावर 25 हून अधिक तरुणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेत जगदीश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या 20 ते 25 तरुणांच्या गटाने हल्ला केला. जगदीश गायकवाड, तेजस चाफेकर यांनी सुशील जाधव, हरेश रमेश गायकवाड, निलेश गायकवाड यांच्यावर लोखंडी हत्यार वापरून हल्ला चढवला. त्यात सुशील जाधव यांच्या उजव्या गालावर, डोक्याचे डाव्या बाजुला मारहाण केली. तर हरेश गायकवाड यांच्या उजव्या डोळयाजवळ, हनुवटीच्या उजव्या बाजुस मारहाण केली. तसेच साक्षीदार निलेश गायकवाड यांच्या डोक्याचे डाव्या बाजुला मारहाण करुन दुखापत केली.

सदर घटनेत सुशील जाधव यांची सोन्याची साखळी तसेच अंगठी हरवली असून हरेश गायकवाड यांची सोन्याची साखळी तुटली आहे. या हल्ल्याची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात केली असून पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version