। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या अत्यंत बहुप्रतीक्षित मालिकेचा बिगुल वाजला असून याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने माईंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या सहकार्यांना सल्ला देताना म्हटले की, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला गोलंदाजीत यश मिळवून देऊ नका. त्याला शांत ठेवा. त्यानंतरच ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकता येईल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने याआधी सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. टीम इंडियाचा संघ यंदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेले. एका क्रीडा वाहिनीशी संवाद साधताना पॅट कमिन्स या वेळी म्हणाला, मी जसप्रीत बुमराचा मोठा चाहता आहे. तो अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. आम्ही त्याला शांत ठेवू याची आशा आहे. त्यामुळे आम्हाला मालिकाही जिंकता येऊ शकेल. भारतीय संघामध्ये बुमरासोबत इतरही गोलंदाज आहेत. जे ऑस्ट्रेलियामध्ये अद्याप खेळलेले नाहीत. आम्ही अजून त्यांना पाहिलेले नाही. पॅट कमिन्सने याप्रसंगी आयसीसी स्पर्धांमध्ये भारताविरुद्ध मिळवलेल्या यशाचा आम्हाला फायदा होईल, असे म्हटले. तो म्हणाला, भारताने आम्हाला आमच्याच देशामध्ये दोन कसोटी मालिकांमध्ये पराभूत केले. मात्र, त्या मालिकांना बराच अवधी झाला आहे. आम्ही भारतावर जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय साकारला. तसेच एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात त्यांच्यावर मात केली. आमच्यासाठी हे क्षण संस्मरणीय आहेत, असेही तो म्हणाला. भारताविरुद्धची मालिका ही नेहमीच अव्वल दर्जाची ठरत असून, मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.