| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल-उरण परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणार्या विजेंद्र गावंड या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 19 मे रोजी भोमनगर, साई गाव येथील राकेश बाळू गायकवाड यांच्या घरामध्ये रात्री 12.30 वाजता अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, एलपीजीने भरलेला सिलिंडर व इतर साहित्याचे चोरी केली होती. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे व पोलीस पथकाने केला.
तांत्रिक तपास व विविध ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती प्राप्त करून आरोपी विजेंद्र गावंड (रा. पिरकोन, उरण) याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील घरफोडी चोरी करून नेलेला सर्व मुद्देमाल तसेच इतर गुन्ह्यांतील चोरीस गेलेले तीन लाखांचे सोन्याचे दागिने, एक लाख नऊ हजारांचे 15 मोबाईल, एक हुंदाई कंपनीची कार, गॅस सिलिंडर आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्ह्यातील आरोपी याच्यावर यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असून, तो जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरफोडी करणार्या आरोपीला अटक
