। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील कर्जत, गोरेगाव तसेच मुंबई घरफोड्या करणार्या अट्टल गुन्हेगारांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडून 9 लाख 55 हजार 135 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
अलेक्सझेंडर मरियाराज देवेंद्र (वय 46 रा.खोली नंबर 12 नायगाव, ता.वसई), मकसूद मोहम्मद मुकादम (वय 40, रा.जस नाईक मोहल्ला भोस्ते ता.खेड, जि. रत्नागिरी), रहिमतुल्ला इब्राहिम डावरे (वय 55 रा.दहिवली ता.माणगाव, जि.रायगड) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अलेक्झांडर मरियाराज देवेंद्र यांच्याविरोधात मुंबई शहर हद्दीत घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी मकसूद मोहम्मद मुकादमविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे.
जिल्ह्यातील घरफोडींचे वाढते प्रमाण पाहता जिल्हा अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. त्यानूसार पोलिसांनी तपास करुन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कर्जतमधील पाच व गोरेगावमधील एका घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरलेल्या एकूण ऐवजापैकी 287.5 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 2600 रुपये असा एकूण 9 लाख 55 हजार 135 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
हा तपास पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पीएसआय महेश कदम, पोलीस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, देवराम कोरम तसेच सायबर सेलचे अक्षय पाटील आणि तुषार घरत यांनी मोलाची कामगिरी केली.
कर्जतमध्ये घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार गजाआड
