माणगावात भरदिवसा घरफोडी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील श्री समर्थकृपा, वाकडाईनगर (उत्तेखोल) येथे शुक्रवारी (दि.10) सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास एका बंद घरावर चोरट्याने डल्ला मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे व सामान अस्ताव्यस्त करून चोरट्याने सुमारे 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्याने पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार फडताडे करीत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी आपली घरे सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version