बस आणि ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

| पंढरपूर | प्रतिनिधी |

पंढरपूर जवळ ट्रक आणि बसचा रविवारी (दि.29) पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीरित्या जखमी झाले आहेत. हा अपघात भटुंबरे गावाजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, भटुंबरे गावाजवळ भाविकांची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. आज सकाळी पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या भटुंबरे गावा नजीक अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून बस मधील बेबाबाई महाळसकर (55) व जनाबाई महाळसकर( 7) यांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी 12 जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version