अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आकारले जातेय भाडे
महाड | प्रतिनिधी |
राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, अपंग, खेळाडू व अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना प्रवास भाड्यामध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत कोण कोणत्या बसमध्ये आणि कुणा कुणाला दिली आहे, याबाबत महामंडळात काम करणारे आणि प्रत्यक्षात प्रवाशांशी संबंध येणार्या वाहकांना माहीत नसल्याने अनेक वेळा वादाचे प्रसंग प्रवासी व वाहक यांच्यामध्ये प्रवासादरम्यान निर्माण होत असतात. त्याचा भुर्दंड व मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागत आहे.
महाडमधील अधिस्वीकृतीधारक पत्रकार संजय भुवड हे कार्यालयीन कामानिमित्त बुधवार, दि. 18 ऑगस्ट रोजी मुंबई येथे गेले होते. परतीच्या प्रवासात ते चेंबूर येथे पनवेलकरिता खोपोली बस क्र. एमएच 14/ बीटी 2668 मध्ये बसले. वाहकाकडे ईटीईएम मशीन नसल्याने ते जुन्या ट्रेमधून तिकीट बुकींग करीत होते. वाहक पठाण यांना पत्रकार भुवड यांनी अधिस्वीकृती कार्ड व एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड दाखवून आपल्याला मोफत प्रवासाची सवलत असल्याचे सांगितले. मात्र, वाहकाने एसटीच्या सवलत कार्ड मोफत प्रवास सवलत असल्याचे व प्रवासाची कालमर्यादा याचा उल्लेख नसल्याची त्रुटी दाखवून देत ईटीईएम मशीन नसल्याने तुम्हाला प्रवास भाडे आकारावे लागेल, असे सांगितले. वाहकाशी हुज्जत नको म्हणून पत्रकार भुवड यांनी प्रवास भाड्याची रक्कम देत दूरध्वनीवरून पेण येथील विभागीय कार्यालयातील सवलत पास देणारे अधिकारी सुरेश चांदोरकर व डीसी श्रीमती बारटक्के यांच्याशी संपर्क साधून झाला प्रकार सांगितला व तशा प्रकारची लेखी तक्रार नोंदवली. पनवेल स्थानकात पोहोचल्यानंतर स्थानक प्रमुख व वाहतूक नियंत्रकाकडे तक्रार बुक मागितले असता ते जाग्यावर नसल्याचे सांगण्यात आले व बर्याच अवधी नंतर ते उपलब्ध झाले नाही.
पनवेल स्थानकातून कोकणात जाण्यासाठी सायंकाळी 7 ते 10 वाजे पर्यत एकही साधी निमआराम व शिवशाही बस उपलब्ध नव्हती. या दरम्यान कोकणात जाणार्या तीन शयनयान बस आल्या. मात्र बोरीवली राजापूर बस क्र एमएच 09 एफ एल 0370चे वाहक ( बॅच नंबर 7597 ) व अन्य बसचे वाहक व पनवेल येथील वाहतुक नियंत्रकांना अधिस्विकृती धारक पत्रकारांना एसटी च्या शयनयान बसमधून मोफत प्रवासाची सवलत असल्याची माहिती नसल्याने त्यांनी पत्रकार भुवड यांना या बसमधून मोफत प्रवासाची सवलत नाकारली. याबाबतही पेण विभागातील चांदोरकर यांना विचारणा केली असता त्यांनी बघावे लागेल, असे सांगितले.
एसटीतून प्रवास करताना सवलतीवरुन प्रवासी व वाहक यांच्यामध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवत असतात. हे टाळण्यासाठी एसटीच्या सर्व वाहकांना वरिष्ठांकडून सवलतीची माहिती पुरवावी अथवा सवलतींचे सर्व जीआर त्यांच्याकडे ठेवण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.