भरधाव एसटीत बस चालकाला चक्कर

वाहक नितीन मोरे यांच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

| कर्जत | संजय गायकवाड |

पनवेलहून कर्जतकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चक्क बस चालकाला चक्कर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र, बसचे वाहक नितीन मोरे यांनी प्रसंगावधान राखत बसचा ताबा आपल्या हातात घेतला. अत्यंत संयमाने आणि कौशल्याने त्यांनी बस सुरक्षितपणे कर्जतपर्यंत आणली. त्यांच्या या धाडसी आणि समयोचित कृतीमुळे संभाव्य अनर्थ टळला.

पनवेलहून कर्जतकडे येणारी एसटी बस सोमवारी (दि.24) सायंकाळच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. ती चौक फाटा येथे पोहोचली असता अचानक एकच गोंधळ उडाला. “अहो, यांना चक्कर येते!” असा आवाज पुढील बाजूने आला आणि काही क्षणांसाठी प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला नेमके कोणाला त्रास होत आहे, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, काही क्षणांतच समजले की, बसचे चालक संदीप सोनावणे यांना अचानक चक्कर आली आहे. परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता लक्षात येताच बसमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. पुढे काय होणार, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला. याचवेळी बसचे वाहक नितीन मोरे यांनी अत्यंत प्रसंगावधान दाखवत तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी चालकाला सुरक्षितपणे बाजूला बसवले आणि स्वतः चालकाच्या सीटवर बसून बसचा ताबा घेतला. अत्यंत संयमाने आणि कौशल्याने त्यांनी बस सुरक्षितपणे कर्जतपर्यंत आणली. त्यांच्या या धाडसी आणि समयोचित कृतीमुळे संभाव्य अनर्थ टळला. साधारण सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एसटी बस कर्जत आगारात सुरक्षित पोहोचली. प्रवाशांनी वाहकाच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले.

घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी बस स्थानकापर्यंत जाऊन चालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच, स्थानक अधिकाऱ्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देऊन वाहकाने केलेल्या धाडसी कामाची नोंद घेण्याची विनंती केली. त्यानंतर बसचे वाहक नितिन मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले. चालक संदीप सोनावणे यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. उष्माघातामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण प्रसंगात वाहक नितीन राजाराम मोरे हे खऱ्या अर्थाने खाकी वर्दीतले देवदूत ठरले. त्यांच्या धैर्य, जबाबदारीची जाणीव आणि प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचे जीव सुरक्षित राहिले.

– विकास चित्ते, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version