यंदाही टपरीधारक वार्‍यावरच; स्वतःची जागा नसल्याने व्यवसाय संकटात

। सुतारवाडी । वार्ताहर ।
पनवेल ते इंदापूर या महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून अगदी धीम्या गतीने सुरू असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या वडिलोपार्जित व्यवसायावर गेल्या दहा वर्षांपासून लहान व्यापारी तसेच टपरीधारकांवर मोठे संकट आले आहे.

पनवेल ते इंदापूरदरम्यान नागोठणे, सुकेळी, खांब, कोलाड, तळवली तसेच इंदापूरदरम्यान अनेक टपरीधारक वडापाव, कटलरी, किरकोळ सामान, भाजी, फळ विक्रेते आदी गेल्या दहा वर्षांपासून आपली स्वतःची जागा रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये गेल्याने इतरत्र जागेत जेमतेम व्यवसाय करीत आहेत. त्यात गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे मोठी मंदीची लाट पसरली आहे.

गणपती, गोविंदा, दिवाळी, होळी या सणांमध्ये बर्‍यापैकी गिर्‍हाईक बाजारात खरेदीसाठी येत असतात. मात्र गेल्या दहा वर्षापासून आपली स्वतःची जागा सोडून इतरत्र दुकाने हलवावी लागल्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्‍न त्यांना पडला आहे. 10 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होणार आहे. आपल्याला आपली हक्काची जागा नसल्यामुळे आम्ही दुकान पावसात कोठे मांडणार, असा ज्वलंत प्रश्‍न लहान व्यापार्‍यांना पडला आहे. या धीम्या गतीनेने चालणार्‍या कामामुळे किती दिवस आर्थिक नुकसान सहन करायचे, असा प्रश्‍न रस्त्यालगत व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांना पडला आहे.

Exit mobile version