। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यातून कोट्यवधी रुपये खर्च करून विकासकामे सुरू आहेत. त्यात अनेक भागात रस्तेदेखील बनविले जात आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून नादुरूस्त, खड्डेमय आणि धोकादायक स्थितीत असलेल्या वंजारपाडा-देवपाडा रस्त्याला कोणत्याच विभागाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने देवपाडा ग्रामस्थांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्गाला लागुन आणि पुढे कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला जोडणारा दहिवली-देवपाडा या रस्त्यावरील वंजारपाडा ते देवपाडा पुढे चिंचवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे तसेच लोकप्रतिनिंधीकडे तक्रारी, निवदेन देऊनदेखील आजपर्यंत या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. अत्यंत धोकादायक रस्त्यामुळे या रस्त्यावरील एसटीसेवादेखील बंद करण्यात आली आहे. रिक्षा, दुचाकी देखील जीव मुठीत घेऊन चालवावी लागत आहे. असे असताना मात्र या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनीदेखील दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याची पाहणी करून निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी देवपाडा गावासह परिसरातील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.