। श्रीवर्धन । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन पर्यटन संचलनालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली प्रादेशिक पर्यटन संचलनालय कोकण विभाग श्रीवर्धन पर्यटन संस्था यांच्या वतीने श्रीवर्धन समुद्रकिनारी दोन दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.
26 व 27 मार्च रोजी होत असलेल्या पर्यटन महोत्सवाची सर्वानाच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. खा. सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या व आ. अनिकेत तटकरे यांनी नियोजन केलेल्या बीच फेस्टिव्हलची आठवण श्रीवर्धनमधील नागरिक करत आहेत. पुन्हा एकदा त्याच जोशात राज्याच्या पर्यटन विभाग पर्यटन संचालयान मुंबई व श्रीवर्धन पर्यटन संस्था यांच्यामार्फत श्रीवर्धन पर्यटन महोत्सव भरणार असून, याचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे असणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
दोन दिवसीय पर्यटन महोत्सवात दि. 26 मार्च रोजी वाळू शिल्प प्रदर्शन, खाद्य संस्कृती प्रदर्शन, गिधाड संवर्धन, सर्प मित्र ओळख, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्वर गंधर्व संगीत मैफल, तर 27 मार्च रोजी मर्दानी खेळ, तर मराठी कलाकार अंशुमन विचारे यांचं चाल तुरुतुरु आदी डोळे दिपवून टाकणारे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
विनामूल्य प्रवेश
त्याचबरोबर कोकणची खाद्य संस्कृती आदी दर्शनासाठी व विक्रीसाठी त्याचबरोबर कोकणातील काही विशिष्ट वस्तूंचे विक्रीसाठी 50 स्टॉल्स उभारले जाणार आहेत. पर्यटन महोत्सवामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या खाद्य कलाकौशल्यातून रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होणार आहे. पर्यटन महोत्सवात सर्व पर्यटक व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असून, जास्तीत जास्त पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.