| महाड | प्रतिनिधी |
शिवराज्याभिषेक 5 जून आणि 6 जून रोजी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर गॅस, स्टोव्ह आणि अन्य ज्वालाग्रही साधनांच्या वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून स्थानिक व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेत या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत सहकार्याचे आवाहन केले आहे. यावेळी व्यावसायिकांनीही सुरक्षिततेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करू, असे आश्वासन दिले. मात्र, कोणत्याही दबावाखाली व्यावसायिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास ग्रामस्थ, व्यावसायिक आणि शिवभक्त एकत्रितपणे विरोध करतील, असा इशाराही देण्यात आला.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. यामुळे बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर मार्ग तसेच चित्त दरवाजा ते होळीचा माळ परिसरात गॅस, स्टोव्ह आणि अन्य ज्वालाग्रही साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ तयार करण्यास कोणतीही बंदी नसून ते सुरक्षित ठिकाणी तयार करून विक्रीसाठी आणता येतील, असेही प्रशासनाने सांगितले. दरम्यान, रायगड रोपवे कॅन्टीन आणि उत्सव समितीच्या भोजन व्यवस्थेत गॅस सिलेंडरचा वापर होत असताना केवळ स्थानिक व्यावसायिकांवरच निर्बंध का, असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला. यावेळी सर्व व्यावसायिक सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, असे आश्वासन देण्यात आले.
गॅस-स्टोव्ह बंदीवरून व्यावसायिक आक्रमक
