। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका भात पिकविणारा तालुका असून या तालुक्यातील शेतकर्यांनी पिकविलेल्या भाताची हमी भावाने विक्री केली जाते. यावर्षी जिल्हा फेडरेशन शेतकर्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात भाताची मळणी करण्यात शेतकरी गुंतले आहेत, त्यामुळे शेतकर्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणीचे निवेदन तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदार यांना सादर केले आहे. 31 ऑक्टोबरपूर्वी ज्यांना भात विकायचा आहे त्यांची ऑनलाइन नोंदणी केली पाहिजे असा नियम आहे. परंतु काही शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी बद्दल माहीत नसल्याकारणाने त्यांची नोंदणी झालेली नाही. आता भात खरेदी केंद्रवाले त्यांची नोंदणी नसल्याने भात घेणार नाही असे सांगत आहेत. त्यामुळे जो शेतकरी स्वतःचा सातबारा व आधारकार्ड घेवून केंद्रावर जाईल त्यांचे भात खरेदी करून घ्यावे अशा सूचना या खरेदी केंद्रवाल्यांना द्याव्या किंवा ऑनलाइन नोंदणीची मुदत काही दिवसांकरीता वाढवावी. जेणेकरून अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदत होईल, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. हे निवेदन देताना सुनील गोगटे, परशुराम म्हसे, शिरीष कदम, नथू कराळे, दशरथ मुने आदी उपस्थित होते. जर ही मागणी मान्य झाली नाही तर भाजप किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.