। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या खासगी बसला धडक दिली. यात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, बसचेही नुकसान झाले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मृत चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
बोरीवली येथील मागाठाणे पुलावर हा भीषण अपघात झाला. दहिसरवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली. परंतु, गाडीचा वेग अधिक असल्यामुळे ती दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली केली. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला कारने धडक दिली. या धडकेत बस चालकाचेही स्टेअरिंग जॅम झाले आणि बसही दुभाजकावर चढली. तिचे टायर फाटल्यामुळे मोठा आवाज झाला. सुदैवाने बहुसंख्य प्रवासी बसमधून पूर्वीची उतरले होते. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये चालक, क्लीनर व एक प्रवासी होता. अपघातानंतर मोटरगाडी बाजूला पडली होती. त्यात चालक अडकला होता.
अपघाताची माहिती मिळतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चालकाला बसमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोेषित केले. अमित सुरेश अग्रवाल (47) असे अपघातातील मृत चालकाचे नाव असून तो बोरीवली येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खासगी बसमधील प्रवासी अनिल गुरव (32) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निष्काळजीपणे मोटरगाडी चालवल्याप्रकरणी अमित अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.