। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
दुचाकीला कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी कारवरील चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकापुर, सुवर्णभूमी कॉम्प्लेक्स येथे राहत असलेले अमोल कुमार प्रभाकर बोधिराज हे शुक्रवारी (दि.13) रात्री अकराच्या सुमारास त्यांचा भाऊ दिनेश बोधिराज यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकी घेऊन टोल बुद्रुकला गेले होते. कार्यक्रम उरकून ते शनिवारी (दि.14) रात्री सव्वा बाराच्या सुमारास पनवेल येथील राहत्या घरी पळस्पे फाटा ते सुकापुर या ठिकाणी येत होते. यावेळी दिनेश गाडी चालवत होता तर अमोल कुमार पाठीमागे बसले होते. पहाटे पावणेतीनच्या सुमारास रॉयल एनफिल्ड शोरूम समोरील रस्त्यावर भिंगारी गाव, पनवेल येथे रस्त्यावर स्पीड ब्रेकर आल्याने दिनेशने ब्रेक दाबला. यावेळी पाठीमागून आलेल्या सुझुकी एर्टिगा कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल आणि दिनेश दोघेही खाली पडून जखमी झाले. मात्र यावेळी कारचालक दोघांनाही वैद्यकीय मदत न करता निघून गेला. स्थानिकांनी त्यांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवले. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
दुचाकीला कारची धडक; दोघे जखमी
