कारणे दाखवा नोटीसकडेही दुर्लक्ष
| पेण | प्रतिनिधी |
कारमेल हायस्कूल प्रशासनाच्या कारभाराबाबत पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी होत असतानाच आता शाळा प्रशासनाने थेट शिक्षण विभागाच्या नोटीसलाच प्रतिसाद न दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या आदेशांना शाळा प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा पेणमध्ये रंगू लागली आहे.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी 9 जून रोजी पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे कारमेल हायस्कूलच्या कारभाराबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, संबंधित नोटीस स्वीकारण्यासही शाळा प्रशासनाने टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने सदर नोटीस ई-मेलद्वारे पाठविली. तरीदेखील आजपर्यंत शाळा प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण किंवा उत्तर प्राप्त झाले नसल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकृत नोटीसलाच कारमेल हायस्कूल प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत असून, प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकारालाच आव्हान दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सकाळच्या सत्रात घेऊन दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सोडण्याचे आदेश दिले असतानाही कारमेल हायस्कूलमध्ये या आदेशांचे पालन होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनाही शाळा प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र समोर येत आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाने ठोस कारवाई न केल्यास पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वप्नील म्हात्रे यांनी दिला आहे.
शिक्षण विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष, प्रशासकीय आदेशांचे कथित उल्लंघन आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारमेल हायस्कूल प्रशासनाविरोधात पुढे कोणती कारवाई होते, याकडे पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.






