| चणेरा | प्रतिनिधी |
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्याम लोखंडे यांची रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रोहा तालुक्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या कार्यकारिणीकडून संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रायगड प्रेस क्लब तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेला रोहा प्रेस क्लब हा जिल्ह्यातील जागृत, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांची संघटना म्हणून ओळखला जातो. नव्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेचा कार्यक्रम माजी अध्यक्ष सुहास खरिवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी पत्रकार संघटनांच्या बळकटीकरणासाठी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, कार्याध्यक्ष सुहास खरिवले, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष अंजुम शेट्टे, सचिव रवींद्र कान्हेकर, सहसचिव दीपक भगत, खजिनदार दीप वायडेकर, मुख्य संघटक उद्धव आव्हाड, संघटक संतोष सातपुते, संपर्क प्रमुख विश्वजित लुमन, प्रसिद्धी प्रमुख मरवडे, सह प्रसिद्धी प्रमुख सत्यप्रसाद आडाव यांची निवड करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळ्यास माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, महेश बामुगडे यांच्यासह ज्येष्ठ आणि युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून रोहा प्रेस क्लबची वाटचाल अधिक प्रभावी, गतिमान आणि पत्रकारहिताची होईल, असा विश्वास व्यक्त केला.







