जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका; पोलिसांकडून कारवाई
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड हद्दीतील हॉटेल पाटील ब्रदर्स पांडवादेवी येथे 1000 जोडप्यांचा सामूहिक पद्धतीने लग्न सोहळा आयोजित केला होता. आयोजकांनी जिल्हाधिकारी रायगड यांचे जमावबंदीचे आदेश असताना देखील कोणतीही परवानगी न घेता सोहळ्याचे आयोजन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहळ्याठिकाणी भांडण झाल्याप्रकरणी सहा जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोयनाड येथे आयोजित केलेल्या सामूहिक लग्नसोहळ्याला रायगड जिल्ह्यातून जवळपास तीन ते चार हजार लोक उपस्थित होते. मात्र, तेथे आलेल्या सर्व वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अपुरी असल्यामुळे सर्व गाड्या रोडवर लागून वाहतूक कोंडी झाली होती. पेण, अलिबाग हा महामार्ग अरुंद असल्यामुळे येणारे पर्यटक व कार्यक्रमासाठी उपस्थित महिलावर्ग, पुरुषवर्ग, त्यातच रविवार असल्याने मुरुड जंजिरा, अलिबागकडे येणाऱ्या व जाणाऱ्या पर्यटकांना या ट्राफिकमुळे आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला.
पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश सांगडे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्षरित्या पाहणी करून ट्राफिक ए. एस. आय .पवार, ए. एस. आय. भगत, पोलीस हवालदार सतीश पाटील यांची नियुक्ती करून ट्रॅफिक नियंत्रणात आणण्यात आली. ज्यांनी
कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं त्याना भेटून त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. मात्र, आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने आयोजकांवर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये भांडण झाल्याप्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश सांगडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोल्हे यांनी दिली.
