खामगाव पंचक्रोशीतील गुरे चोरीला

म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील खामगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील अन्य गावांतून शेतकर्‍यांची गुरे चोरीला जात असल्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कणघर येथील नाना सावंत यांच्या दोन गाई जंगलात चरण्यासाठी गेल्या असता त्या गोठयात परत आल्याच नाहीत. पुन्हा दोन दिवसांत खामगाव मधील सुतारवाडी, ताम्हाणेशिर्के, कासारमलई या परिसरात शेतकर्‍यांचे गोधन गायब केल्याच्या घटना घडल्या.चोरीला गेलेल्या गुरांचा शोध घेऊन तपास लागत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.गोधन चोरीला जात असले बाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सातत्यपूर्ण होत असलेल्या पशुधन चोरीमुळे शेतकर्‍यांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. पोटच्या गोळ्या पेक्षाही जिवापाड प्रेम केलेले पशुधन चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गोधनाची चोरी करणार्‍यांचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version