विविध शाळांमध्ये हात धुणे दिन साजरा

माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील आई कनकाई सामाजिक संस्था होडगांव यांच्यावतीने तालुक्यातील होडगांव, होडगाव कोंड, आदिवासीवाडी, खर्डी, हातकेली व मुगवली येथील जि. प. शाळांमध्ये जागतिक हात धुणे दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या सहयोगाने उपस्थित प्रत्येक कुटुंब व्यक्ती आणि शाळकरी मुलांना साबण वाटप करण्यात आले. ह्यावेळी संस्थेच्या सदस्यांनी उपस्थितांना हात धुण्याची पद्धत समजावुन सांगितली. तसेच काही ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष हात धुण्याची प्रात्यक्षिक देखील करून घेतली. सदर कार्यक्रमाला ग्रामसेवक नरेश तरडे , उपसरपंच शंकर खाडे, शाळेतील शिक्षक वर्ग आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.विशेष बाब म्हणजे रिक्षा चालकांच्या मदतीने सकाळच्या सत्रात संस्थेकडुन होडगांव घरोशी रस्त्यावरून जाणार्‍या प्रत्येक प्रवाशांना व व्यक्तीना हात धुण्याचे महत्व पटवुन देऊन त्यांना भेट वस्तु म्हणून साबण देण्यात आले. 1200 पेक्षा जास्त लोकांनी या संधीचा लाभ घेता आला. ग्रुप ग्रामपंचायत होडगांव आणि परिसरातील नागरिकांनी हया अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version