सीडब्ल्यूसीच्या विरोधात साखळी उपोषण

502 कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड
| उरण | वार्ताहर |
भेंडखळमधील सी पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्ल्यु.सी) कंपनीच्या विरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. कंपनीचा कामाचा व्याप मागच्या कालावधी पेक्षा सध्या कामाचा व्याप जास्त दुपटीच्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा कंपनीने कामगार व कामगारांच्या पगारात 60 टक्क्यांनी कपात केली आहे. कंपनी एक प्रकारे कामगारांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. तरीसुद्धा स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांनी आपली कंपनी सुरळीत चालू होण्यासाठी काही तात्पुरत्या अटी मान्य केल्या आहेत.

कामगारांना जुना पगार 32000 ते 40,000 पर्यंत पगार होता. आता पोलारीस कंपनीने नव्याने कारभार करायला घेतल्याने 15 वर्षे जुने असलेल्या कामगारांना 12000 रुपये सध्या कंपनी प्रशासन पगार देणार आहे. परंतु कामगारांचे म्हणणे असे आहे की जुना पगार 2 वर्षात पूर्ण करा. थोडे थोडे करून जुना पगार पूर्ण द्यावा. मात्र कंपनी प्रशासनही कामगारांची मागणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या 502 कामगारांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी बेमुदत साखळी उपोषणाचा पहिला दिवस होता.पहिल्याच दिवशी सर्व कामगार, कामगारांचे कुटुंब पोलारीस लॉजिस्टिक कंपनी, भेंडखळच्या गेट समोर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, कामगार नेते भूषण पाटील, सुधाकर पाटील,सरपंच मंजिता मिलिंद पाटील आदींनी पाठिंबा दिला.

पोलारीस कंपनी प्रशासनाने उरण मधील स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय केला आहे. कामगार हा महत्वाचा घटक आहे. मात्र कामगारांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने मी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. त्याशिवाय मागे हटणार नाही. – भूषण पाटील, कामगार नेते तथा जेएनपीए माजी विश्‍वस्त.

Exit mobile version