| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या 800 मीटर उंचीवर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पाण्याचा तलाव आहे. जंगल भागात असल्याने या तलावात पावसाळ्यातील पाण्याबरोबर दगडमाती साठून राहिले आहेत. 2013 नंतर शार्लेट लेकमधील गाळ काढण्यात आला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. दरम्यान 2024 मध्ये तलावातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली, मात्र तेव्हापासून गाळ काढण्याचे काम रखडलेले आहे.
माथेरान शहरात पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक आहे. तेथील पाण्याची साठवण क्षमता जंगलातील गाळ, माती वाहून आल्याने कमी झाली आहे. 2013 मध्ये या तलावातील गाळ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 2000 श्री सदस्यांनी श्रमदान करून काढला होता. त्यानंतर एक तप पूर्ण झाले असून अनेक वर्षे शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची मागणी होत आहे. त्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष कदम यांनी उपोषणदेखील केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपरिषदकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण सुरू केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जाग आली आणि 2024 मध्ये गाळ काढण्याचा निर्णय झाला. शासनाने केंद्र सरकारच्या अमृत 2 मधून पाच कोटींची निविदा काढली. माथेरान नगरपरिषदेस राज्य शासनामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेतंर्गत माथेरान येथील शार्लोट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठीच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र माथेरान नगरपरिषदेकडून अद्यापही गाळ काढण्यात आलेला नाही. त्यानंतर सलग दोन वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करीत आहे. मात्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषद यांच्याकडून शार्लोट लेकमधील गाळ काढला गेला नाही. शेवटी मनसेने आक्रमक भूमिका घेत शहर अध्यक्ष संतोष कदम आक्रमक झाले असून त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. पी. वेंगुर्लेकर यांची भेट घेतली.
शार्लेट लेकला स्वच्छतेची प्रतीक्षा
