चिरनेर कुंभारपाड्यातील मूर्तींचे आकर्षण

ओमकार कलाकेंद्रात मूर्ती निर्मितीची शतकोत्तरी परंपरा

। चिरनेर । प्रतिनिधी ।

महागाई असली तरी चिरनेरमधील ओमकार कला केंद्रामध्ये गणेश भक्तांची मे महिन्यापासून ये-जा सुरू होते. त्याचे कारण म्हणजे फोटो प्रमाणे गणेशमूर्ती बनवून दिल्या जात असल्याने या कारखान्यात गणेशभक्त ऑर्डरसाठी येत असतात. चिरनेर येथे घडविल्या जाणार्‍या गणेशमूर्तीच्या कारखान्याला 100 वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा आहे.

अवघ्या वीस पंचवीस दिवसांवर गणेशोत्सव उत्सव येऊन ठेपल्याने सुंदर, सुबक व देखण्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या चिरनेर कुंभारपाड्यात गणेशमूर्तींची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक मूर्तिकार रात्रंदिवस या कामात व्यस्त असल्याचे चित्र येथील सर्वच घरगुती गणपती कारखान्यातून पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने उरण, पनवेल, नवीमुंबई, मुंबई येथील गणेश भक्तांसाठी चिरनेरच्या कुंभारपाड्यातील गणेशमूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे. एकेकाळी छायाचित्राप्रमाणे शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात त्याकाळी केवळ शाडू मातीच्याच मूर्ती बनविल्या जात असत. आता काळाच्या ओघात कामे वेळेत उरकत नसल्याने आणि बाहेरील व्यापार्‍यांनी विक्रीसाठी आणलेल्या मूर्तींचे आक्रमण झाल्यामुळे शाडू मातीपासून बनविल्या जाणार्‍या मूर्ती या कमी होऊ लागल्या आहेत.

दरम्यान या कुंभारपाड्यात पर्यावरणपूरक मातीपासून बनविल्या जाणार्‍या गणेशमूर्तींचे निवडक कारखाने आहेत. त्यात गजानन चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, दामोदर चौलकर, सुनील चौलकर, अमित चिरनेरकर, प्रसाद चौलकर, रंगनाथ चौलकर, नारायण चिरनेरकर,जीवन चौलकर, प्रकाश चिरनेरकर, भालचंद्र हातनोलकर, विष्णू चौलकर, रामा चौलकर, विलास हातनोलकर, नरेश हातनोलकर, दीपक म्हशीलकर, रघुनाथ हातनोलकर, विजय चौलकर, भाई चौलकर, संदेश चौलकर, विष्णू चौलकर, रामा चौलकर, तसेच अन्य मूर्तिकारांचे कारखाने आघाडीवर आहेत. आज या सर्वांची तिसरी, चौथी, पाचवी पिढी शाडू मातीपासून मूर्ती घडवित आहेत.

चिरनेरमधील गणेशमूर्ती बनविण्याचा उद्योग शंभर वर्षाहून अधिक जुना आहे. येथील सुबक, देखण्या, रेखीव, आकर्षक मूर्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या व्यवसायात 50 हून अधिक लहान मोठे घरगुती कारखाने कार्यरत आहेत. इथे कुंभार समाजाची वस्ती आहे. या समाजातील कलाकार या व्यवसायावर अवलंबून आहेत आणि ते त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे.

– भाई चौलकर, मूर्तिकार

Exit mobile version