पर्यटनवाढीसाठी शासनाकडून निधीची आवश्यकता
| रेवदंडा | वार्ताहर |
रायगड जिल्हा पर्यटन समृद्ध आहे.किल्ले, गड, थंड हवेची ठिकाणे अभयारण्य, लेण्या कमी नाहीत. अलिबाग शहरापासून दक्षिण टोकाला हाकेच्या अंतरावर असलेल्या चौल-रेवदंडा जोड गावात पर्यटनवाढीसाठी शासनाने निधी देण्याची गरज आहे. नारळी-पोफळीच्या डौलदार बागा आणि शांत, सुरक्षित असलेला किनारा ही प्राचीन नगरे पर्यटन स्थळे म्हणून आजही विकासापासून वंचित आहेत.
अलीकडे धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य माणूससुध्दा खिशाला परवडेल अशा स्थळांच्या शोधात असतो. प्रगत दळणवळणाच्या सहाय्याने एखाद्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाला भेट देऊन रात्री परत घरी जाता येईल अशा ठिकाणाच्या शोधात पर्यटक असतात. अनेकांना तर फक्त निवांतपणा हवा असतो. त्यांच्यासाठी चौल-रेवदंडा ही स्थळे परवडणारी असली तरी सुविधांची स्थित बिकट असल्याने मुरुडसारख्या प्रतिगोवा मानल्या गेलेल्या काशिद समुद्रकिनारी जात असलेल्या पर्यटकांचा ओघ येथे थांबवता येऊ शकला तर येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
अलिबागवरून मुरुडकडे जाताना लागणारी प्राचीन नगरे, अरूंद रस्ते, अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्याचा प्रवासामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली नाहीत. उत्तम प्रतिची उपाहारगृहे नाहीत. वाहनतळ नाही, त्यामुळे पर्यटक येथे थांबायला पसंत नाहीत. बाह्यवळण मार्ग असो किंवा किनारा असो, त्या ठिकाणी अनेक प्रसंगी कचर्याचे ढीग पडलेले असतात. त्याबद्दलही पर्यटक नाराजी व्यक्त करतात. या किनार्यावर पर्यटकांचा अपघात पाण्यात गेल्याने झाल्याची घटना नाही. मात्र, नागाव, ता. अलिबाग व काशिद, ता. मुरुड यांच्या किनार्यापेक्षा पर्यटकांचा ओघ कमी आहे. अनेक वर्षे विविध प्रकारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी जेट्टी मंजूर झाली असल्याने ती प्रत्यक्षात झाली तर पर्यटन व्यवसाय बहरेल यात शंका नाही.
