आयपीएल 2026 मधील प्रवास संपुष्टात; बीसीसीआयची संघावर कठोर कारवाई
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
21 मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पाच वेळच्या विजेत्या चेन्नईला 89 धावांनी पराभूत केले. हा दोन्ही संघांमधील शेवटचा सामना होता. या सामन्यात, गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर 4 विकेट्स गमावून 229 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार शुभमन गिलने 64, तर सलामीवीर साई सुदर्शनने 84 धावा केल्या. त्यानंतर जोस बटलरने 27 चेंडूंमध्ये 57 धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईचा संघ 13.4 ओव्हरमध्ये 140 धावांवर सर्वबाद झाला. 89 धावांच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे ते आयपीएल 2026 मधून बाहेर पडले.
गुजरात टायटन्सकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. या पराभवातून संपूर्ण संघ सावरण्याआधी त्यांना चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर, बीसीसीआयने कठोर कारवाई करत चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारासह संपूर्ण संघाला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सामन्यात संघाने स्लो ओव्हर रेटचा नियम मोडल्यामुळे ही शिक्षा देण्यात आली.
आचारसंहितेनुसार हा चेन्नई संघाचा या हंगामातील दुसरा स्लो ओव्हर रेट गुन्हा आहे. यापूर्वी, हंगामातील 18 व्या सामन्यात, संघ निर्धारित वेळेत 20 ओव्हर टाकण्यात अपयशी ठरला होता. आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार, जो किमान ओव्हर रेटशी संबंधित आहे. सामन्यानंतर, बीसीसीआयच्या आयपीएल नियामक परिषदेने संघाविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची घोषणा केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. केवळ कर्णधारावरच नव्हे, तर प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयर्ससह उर्वरित खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या 25 टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे.
सीएसकेची निराशाजनक कामगिरी
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने खेळलेल्या 14 सामन्यांपैकी संघाला केवळ सहा सामने जिंकता आले. 12 गुण आणि -0.345 च्या खराब नेट रन रेटमुळे सीएसके प्लेऑफसच्या रेसमधून बाद झाला आहे. गेल्या सलग तीन हंगामात चेन्नईला आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. चेन्नईने 2023 मध्ये शेवटचे आयपीएल विजेतेपद एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.







