मुबंई शहर, पुणे ग्रामीण ठरले मानकरी
। बारामती । क्रिडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषकाचे आयोजन बारामती येथे करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुरूष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघांनी विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर पुर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर 35-31 असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले आहे. मध्यंतराला मुंबई शहर पुर्व संघाकडे 17-9 अशी आघाडी होती. मुंबई शहर पुर्वच्या प्रणय राणे व शार्दुल पाटील यांनी आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर, संकेत सावंत याने उत्कृष्ठ पकडी घेतल्या. पुणे ग्रामीणच्या अक्षय सूर्यवंशी व अजित चौहान, जीवन डोंबले यांनी जोरदार प्रतिकार केला. तर स्वप्नील कोळी याने पकडी घेतल्या.
महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर 37-28 असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले आहे. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे 20-15 अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरवातील अत्यंत अडखळत सुरवात केली होती. मात्र, थोड्याच वेळात सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी आपल्या अत्यंत आक्रमक खेळाने संघाला सावरले व संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत हिने मुंबई शहर पश्चिमची संघनायक असलेल्या सोनाली शिंगटेच्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.