। म्हसळा । वार्ताहर ।
नुकत्याच संपन्न झालेल्या 52 व्या म्हसळा तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती आणि हर घर संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत चिखलप केंद्राने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले आहे. यावेळी, विद्यार्थी प्रतिकृती (विज्ञान मॉडेल) इ. 6वी ते 8वीच्या गटात रा.जि.प. केंद्रीय चिखलप शाळेतील इ. 6वीची विद्यार्थीनी श्रावणी निर्मळ व इयत्ता 8वीचा विद्यार्थी अथर्व शिर्के यांचा तालुक्यात तृतीय क्रमांक आला आहे. तसेच, विज्ञान प्रदर्शनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘हर घर संविधान प्रश्नमंजुषा’ स्पर्धेत तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील 22 शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये चिखलप शाळेतील विष्णू मिसे आणि देवघर कोंड शाळेतील देवेंद्र मुळे यांनी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी यशस्वी स्पर्धकांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, विस्तार मोरे, बशीर उलडे, हर्षल सूर्यवंशी, सावन घोडमारे, दयानंद बरफ, मुख्याध्यापक महादेव पवार, सर्व केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.