| अलिबाग | प्रतिनिधी |
आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने मन:शक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा, शाखा-अलिबाग यांच्या सहकार्याने विनामूल्य बाल संस्कार वर्ग या उपक्रमाचा
शुभारंभ उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश समाजातील बालकांमध्ये चारित्र्य, आत्मविश्वास, संस्कार आणि व्यक्तीमत्व विकास घडविणे हा आहे. संस्कार वर्ग गावदेवी मंदिर, रामनाथ तळ्याजवळ, अलिबाग येथे दर रविवारी सकाळी 9.00 ते 10.30 या वेळेत घेतला जाणार असून, 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आगरी समाज संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत म्हात्रे, शशिकांत गुरव, राकेश चौलकर, संदीप बाम, विनय आपटे, रविंद्र घरत सुप्रिया ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आगरी समाज संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष सुनील तांबडकर, प्रभाकर ठाकूर, उदय म्हात्रे, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, श्रेयस ठाकूर यांनी केले. या वेळी ग्रामस्थ रामनाथ, पालक व बालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या प्रसंगी संदीप बाम यांनी मन:शक्ती प्रयोग केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देत मुलांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि एकाग्रता विकसित करण्याचे महत्व अधोरेखित केले. सुप्रिया ठाकूर यांनी बालसंस्कार वर्गाचे उद्दिष्ट व महत्व सांगत पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार सुप्रिया ठाकूर यांनी मानले.







