| नवी मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय महिला संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवून हरमनप्रीत कौरच्या संघाने वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण केले. भारताच्या 7 बाद 298 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 45.3 षटकांत 246 धावांवर ऑल आऊट झाला. दीप्ती शर्मा व शफाली वर्मा यांच्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला. 87 धावा आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट घेणाऱ्या 21 वर्षीय शेफाली वर्मा हिला प्लेअर ऑफ द फायनल म्हणून गौरविण्यात आले.
डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफालीने 87, दीप्ती शर्माने 58, स्मृती मंधाना 45 आणि रिचा घोषने 34 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन बळी घेतले. मोठ्या लक्ष्यासमोर असताना, दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवरच गारद झाला. कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने सलग दुसरे शतक झळकावले, परंतु, संघाला विजयाकडे नेण्यापूर्वीच ती बाद झाली. भारताची अर्धवेळ ऑफ स्पिनर शेफाली वर्माने दोन विकेट घेत सामना फिरवला. दरम्यान, दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. दीप्तीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
शफाली वर्मा ( 87) व दीप्ती शर्मा ( 58) यांच्या अर्धशतकाला स्मृती मानधना ( 45) व रिचा घोष ( 34) यांच्या खेळीची साथ मिळाली. भारतीय संघाने फायनलमध्ये 7 बाद 298 धावा केल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमधील ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली.
दीप्ती शर्माने 58 धावांनंतर गोलंदाजीत कमाल करताना 39 धावांत 5 विकेट्स घेतल्या आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक व पाच विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. पुरुष किंवा महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीत अशी कामगिरी कुणालाच करता आली नव्हती. दीप्तीने या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 22 विकेट्स घेतल्या आणि तिने 1982 मध्ये जॅकी लॉर्डच्या 22 विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच वर्ल्ड कपमध्ये लीन फुलस्टोनने 23 विकेट्स घेतल्या होत्या. पण, वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात 22 विकेट्स व 215 धावा करणारी दीप्ती ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. शफालीही वर्ल्ड कप फायनलमध्ये प्लेअर ऑफ दी मॅच जिंकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.
2005 आणि 2017 मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं स्वप्ननगरीत साकार करून दाखवलं. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होते. पण दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला अन् अमनजोत कौरनं तिसऱ्या प्रयत्नात कॅच पूर्ण करत भारतीय महिला संघाचा तिसऱ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह 25 वर्षानंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार हे आधीच ठरलं होतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न साकार केले. 2000 मध्ये न्यूझीलंडच्या संघानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर वनडे वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा चौथा संघ ठरला आहे.
भारतीय महिला संघाने टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 298 धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 299 धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने सेमी फायनलनंतर फायनलमध्येही शतक करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. पण शेवटी भारतीय संघाने फायनल बाजी मारत अधुरं स्वप्न साकार केलं.







