। मुंबई । प्रतिनिधी ।
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने येथील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर ‘चिंतामणी चषक 2025’ या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गुड मॉर्निंग स्पोर्ट्स व नवोदित संघाने अनुक्रमे पुरुष प्रथम श्रेणी व कुमार गट कबड्डी स्पर्धचे विजेतेपद पटकावले आहे.
मुंबईतील चिंचपोकळी येथे झालेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंगने लायन्स स्पोर्ट्सचा प्रतिकार 38-27 असा मोडून काढत रोख रु. 35 हजार व चिंतामणी चषकावर आपले नाव कोरले आहे. उपविजेत्या लायन्सला रोख रु. 30 हजार व चिंतामणी चषकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघानी संथ खेळान सुरुवात केली. पहिल्या डावात दोन्ही संघानी एक-एक लोण देत गुणफलक हलता ठेवला. विश्रांतीला 15-14 अशी आघाडी गुड मॉर्निंगकडे होती. शेवटी 11 गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला.
कुमारांच्या अंतिम सामन्यात नवोदित संघाने पूर्वार्धातील 17-21 अशा 4 गुणांच्या पिछाडीवरून शिवमुद्रा प्रतिष्ठानचे आव्हान 46-30 असे हाणून पाडत रोख रू. 15 हजार व चिंतामणी चषक आपल्याकडे खेचून आणला. उपविजेत्या शिवमुद्राला रोख रू. 10 हजार व चिंतामणी चषकावर समाधान मानावे लागले. शिवमुद्राने पहिल्या डावात लोण देत 21-17 अशी आघाडी राखण्यात यश मिळविले होते. परंतु, दुसर्या डावात मात्र ते ढेपाळले. त्यांनतर, झंजावाती खेळ करीत शिवमुद्रावर 3 लोण देत आपला विजय सोपा केला.
प्रथम श्रेणी गटात उपांत्य उपविजयी ठरलेल्या जय भारत आणि गोलफादेवी यांना प्रत्येकी रोख रु. 10 हजार व चषक, तसेच कुमार गटात उपांत्य उपविजयी ठरलेल्या हिंदमाता, अमर यांना प्रत्येकी रोख रु. 5 हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, जय भारतचा हर्ष मोरे पुरुषांत, तर शिवमुद्राचा विशाल लाड कुमार गटात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे खेळाडू, गुड मॉर्निंगचा नंदिश बेर्डे पुरुषांत, तर नवोदितचा ऋषिकेश मालवी कुमार गटात स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले आहेत. या सर्वांना प्रत्येकी रोख रु. 2 हजार 500 व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तसेच, गुड मॉर्निंगचा प्रफुल्ल कदम पुरुषांत, तर नवोदितचा अर्जुन कोकरे कुमार गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले आहेत. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. 5 हजार आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.