| जळगाव | प्रतिनिधी |
पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात रविवारी (दि.19) सकाळी घडली. मुकेश रमेश शिरसाठ (30) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुकेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. दोघांचा विवाह झाल्यापासूनच शिरसाठ कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये सतत वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशवर सपासप वार केले. या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तर मुकेशला वाचवण्यासाठी पुढे आलेले भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही सासरच्या मंडळींनी हल्ला केला. यात सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे. सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, बबलू बनसोडे, प्रकाश सोनवणे, अविनाश सुरवडे आणि एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.