| चिरनेर | वार्ताहर |
नाट्यकलेची समृद्ध परंपरा लाभलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील जीर्ण व मोडकळीस आलेला रंगमंच पाडून त्या जागी नवीन भव्य रंगमंचाची उभारणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या 17 लाखांच्या निधीतून या रंगमंचाची उभारणी करण्यात आली असून, या रंगमंचाला श्रेष्ठ रंगनायक नटवर्य नाना पाटील यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील नाट्यरंगकर्मी व नाट्य रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नटवर्य नाना पाटील यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी या रंगमंचाची उभारणी करून या रंगमंचाला नटवर्य नाना पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून या रंगमंचाची उभारणी करण्यात आली असून, राजिपचे तत्कालीन सदस्य मनोहर भोईर व राजिपचे माजी सदस्य संतोष ठाकूर यांनी हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तर नटवर्य नाना पाटील यांचे सुपुत्र प्रकाश पाटील व घनश्याम पाटील यांनी स्वखर्चातून नटवर्य नाना पाटील यांच्या नावाची पाटी लावली आहे. ग्रीन लँड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा कंत्राटदार भास्कर मोकल यांनी या रंगमंचाचे बांधकाम पूर्ण केले आहे.