चिटफंड घोटाळा प्रकरण! मुख्य आरोपी सतीश गावंडला अटक

मध्यप्रदेशमध्ये कारवाई; दहा कोटींची रक्कम जप्त

| उरण | वार्ताहर |

गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून उरण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळून फरार झालेल्या सतीश विष्णू गावंड याला नवी मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेश येथून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला घेऊन नवी मुंबईत दाखल झाले आहेत. रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली.

या चिटफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी गावंड हा उरण तालुक्यातील पिरकोन गावात राहण्यास असून त्याने दोन वर्षांपूर्वी गुंतवणुकीची बेकायदा योजना सुरू केली होती. एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतविल्यास ही रक्कम 50 दिवसांनंतर 40 टक्के दराने परत देण्याचे प्रलोभन तालुक्यातील गावागावात नेमलेल्या एजंटच्या माध्यमातून नागरिकांना दाखविले होते. अनेकांनी आपल्या जवळचे दागदागिने, जमिनी विकून तसेच काहींनी कर्ज काढून त्याच्या योजनेत पैसे गुंतविले होते. फेब्रुवारीत गुंतवणूकदाराकडून जमा झालेली कोट्यवधीची रक्कम घेऊन पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना उरण पोलिसांनी सतीश गावंड आणि शशिकांत गावंड यांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून दहा कोटींची रक्कम जप्त केली होती. गावंडला उरणची जनता देवमाणूस मानीत होती, त्यामुळे त्याच्याविरोधात कुणीच तक्रारीसाठी पुढे येत नव्हते.

त्यानंतर गावंड हा न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर आला. त्यानंतर त्याने नवी मुंबईतून पलायन केले होते. पैस परत न मिळाल्याने काही गुंतवणूकदारांनी सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी ऑगस्टमध्ये गावंड याच्यासह गावागावात नेमलेल्या त्याच्या 24 एजंटविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा जामीन रद्द करून शोध सुरू केला होता. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दोन महिन्यांपासून गावंड याच्या मागावर होते. अखेर तो मध्यप्रदेशमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ट्रान्झीट रिमांड मिळवून शुक्रवारी रात्री उशिरा त्याला नवी मुंबईत आणले. गावंड याला अटक केल्याने आता तरी पैसे मिळतील अशी आशा वाटत आहे. परंतु गणेशोत्सव नंतर नवरात्रोत्सवावरही त्यांच्या चिटफंडचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version