। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत विधानसभेच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि.24) पेझारीत नारळ वाढवून करण्यात आला. अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते शेकापच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळूशेट पाटील आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेकाप नेते जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीने कार्यकर्ते विशेषतः महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेकापचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्या अगोदर चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी एक वेगळा उत्साह निर्माण झाला.
पेझारी निवासस्थानी भेट
चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील निवासस्थानी जाऊन स्व.नारायण नागू पाटील, स्व.प्रभाकर पाटील, स्व.सुलभा पाटील व स्व. मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच मीनाक्षीताईच्या आठवणींना उजाळा दिला.