। रोहा । प्रतिनिधी ।
जनता दहशतीच्या सावटाखाली आहे. म्हणून जाती धर्मात तेढ निर्माण करणार्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा हल्लाबोल अलिबाग-मुरुड आणि रोहा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केला आहे. तसेच, अलिबाग मतदार संघाला निष्क्रिय आमदार मिळाला असल्याची टीकादेखील त्यांनी आ. महेंद्र दळवी यांच्यावर केली आहे. रोहा तालुक्यातील खैरे खुर्द गावात सोमवारी (दि.11) गावं बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीत जनतेला संबोधित करत असताना शेकाप उमेदवार चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. त्या म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने कधीच जाती धर्मात भेदभाव केलेला नाही. अशा परिस्थितीत या भागातील चिखलात कमळ उगवला तर आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे अजेंडा राहिलेला नाही. जाती धर्मात तेढ निर्माण करणे हाच त्यांचा धंदा आहे. तसेच, गद्दार आमदरांमुळे रायगड जिल्ह्याची अस्मिता धुळीस मिळाली असून अलिबाग मतदार संघाला दळवींच्या रूपाने एक निष्क्रीय लोकप्रतिनिधी मिळाला आहे, असे सांगत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुढे बोतलाना म्हणाल्या की, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या संरक्षणासाठी अद्याप शेतकरी कामगार पक्ष जिवंत आहे. अशा प्रसंगी मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या आमदारांना घरी बसवा आणि येत्या 20 तारखेला निवडणूक चिन्ह असलेल्या शिट्टीला मतदान करून मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. निवडून आल्यानंतर तुमची सेवा करत असताना माझ्याकडून काही कसूर झाल्यास माझे कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असे आवाहन चित्रालेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे.
यावेळी ट्रस्ट अध्यक्ष अब्बास मुकादम, मुस्लिम जमात अध्यक्ष अजीम धनसे, उपसरपंच जुबेर धनसे, बशीर धनसे, वसीम धनसे, अस्लम पितु, मुखत्यार धनसे, ऐतीशाम मुकादम, गणेश मढवी, मनोज भायतांडेल, अनिल साळवकर, शंकर दिवकर, हेमंत ठाकूर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.