| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिकडे त्याच त्या गाड्यातून विरंगुळा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने फिरायला जात असतो. काही जण गड-किल्ले, किनारे, जंगल भटकंती तर काहींचा ओढा धार्मिक स्थळांना तर काही शेतकरी कृषी दौरा करतात. गोवा म्हटले की मौज-मजा आणि निळ्याशार समुद्रकिनारी आनंद लुटण्याचे ठिकाण असे चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु अलिबाग तालुक्यातील कोर्लई येथील ख्रिश्चन बांधवांसाठी जुना गोवा हा तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. कोर्लईमधील ख्रिश्चन बांधवानी संत फ्रान्सिस झेवियर तीर्थक्षेत्र या जुन्या वास्तुला भेट दिली.
सुमारे 472 वर्ष संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव पेटीत ठेवलेले असून दर दहा वर्षांनी नोव्हेंबर ते 5 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी खुले असते. या ठिकाणी भारतातील, जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात. त्या धर्तीवर जुना गोवा येथे जाऊन दर्शनाचा लाभ घ्यायचा हा हेतु ठेवला, अशी माहिती कोर्लईमधील माऊंट कार्मेल चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर बोनावेंचर नुनीस यांनी दिली. सिस्टर जोयाना, फ्रॅसिसका व 26 अन्य महिला पुरुष या ख्रिश्चन बांधवानी अध्यात्मिक भेटीचा लाभ अनुभवला. या स्थळाला भेट देण्याची इच्छा होती, असे फादर नुनीस यांनी स्पष्ट केले. एक तर दर दहा वर्षांनी हा योग येतो, असेही त्यांनी सांगितले.
सन 1542 मध्ये त्या कालावधीत अलिबाग तालुक्याक्यातील काही बंदर ही खूप प्रसिद्ध होती. त्यामध्ये प्रामुख्याने चौल येथील बंदराचा समावेश होता. चौलमधील आगरकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत आहे. याच आगरकोट किल्ल्यामध्ये दोन दिवस संत फ्रान्सिस झेवियर यांनी वास्तव्य केले होते, असे दाखले उपलब्ध आहेत. आता तो भाग रेवदंडा म्हणून सुपरिचीत आहे. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांसाठी जुना गोव्याला जाणे ही एक पर्वणीच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार आहे.
कोर्लईच्या ख्रिश्चन बांधवांची संत फ्रान्सिस झेवियर तीर्थक्षेत्राला दिली भेट
