क्रांतीस्तंभ हलवल्याने नागरिक नाराज

| श्रीवर्धन । वार्ताहर ।
शहरातील ग्रामदेवता श्री सोमजादेवी मंदिराच्या जिर्णोध्दार निमित्ताने आवारातील रस्ता रुंदीकरण, संरक्षण भिंत व लोखंडी फाटकाचे काम सुरू असल्याने पटांगणात स्वातंत्र्याच्या काळानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ सन 1973 साली क्रांतीस्तंभाची स्थापना करण्यात आलेला क्रांतीस्तंभ मुळ स्थळावरून काढून पटांगणात बाजूला नेऊन ठेवल्यामुळे नागरिकांमधे नाराजी निर्माण झाली आहे. श्रीवर्धन शहरातील स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिवीर देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झाले आहेत. त्या हुतात्मांची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या क्रांतीस्तंभाला शहरात पर्यटक आल्यावर आवर्जुन भेट देत. 49 वर्षाच्या परंपरेनुसार शहरात कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी क्रांतीस्तंभाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता होत असते.

काही स्थानिकांच्या मते क्रांतीस्तंभ हा श्री सोमजादेवी मंदिराच्या पटांगणात योग्य त्या ठिकाणी प्रदर्शनी भागात ठेवावा किंवा सध्या ज्या ठिकाणी स्तंभ उभा केला आहे तिथेच सुशोभीकरण करून कायमस्वरूपी ठेवावा. खा. तटकरे यांनी शासकिय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकी दरम्यान क्रांतीस्तंभ समिती मार्फत स्तंभाच्या जागेसाठी मुद्दा उपस्थित केला असता नगरपरिषद शाळा क्रमांक एक व दोन येथील मैदान स्तंभाकरिता सुचवण्यात आले. शासकीय अधिकार्यांनी तहसीलदार कार्यालय येथील शासनाच्या आवारात क्रांतीस्तंभ उभारण्याची तयारी दर्शवली आहे.

15 ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर क्रांतीस्तंभाची पटांगणात योग्य ठिकाणी पुर्नस्थापना न झाल्यास नगरपरिषदेच्या आवारात हाती राष्ट्रध्वज घेऊन मी आमरण उपोषणाला बसणार आहे. ग्रामदेवता श्री सोमजादेवी मंदिर येथील सुशोभीकरण व्हायला पाहिजे. पण क्रांतीस्तंभाकडे दुर्लक्ष नको. क्रांतीस्तंभ हा मंदिराच्या आवारात योग्य ठिकाणी उभा करावा.

– आदेश पाटील, स्थानिक श्रीवर्धन
Exit mobile version