नागरिकांचा अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार
| उरण | वार्ताहर |
उरण पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आमसभेत संबंधित खात्याचे अधिकारी हे नागरिकांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींना कशा प्रकारे केराची टोपली दाखवतात याचा पाढा नागरिकांनी वाचून आमसभेपुढे आपल्या प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी नागरिकांनी उपस्थित केल्या प्रश्नांचे (समस्यांचे) निराकरण करण्याचे आश्वासन आ. महेश बालदी यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
उरणमधील जेएनपीए बंदर वसाहतीमधील सभागृहात शुक्रवारी (दि.28) उरण पंचायत समितीच्यावतीने उरणचे आ. महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन तसेच प्रास्ताविक केले. याप्रसंगी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम, महसूल विभागाचे अधिकारी, सिडको अधिकारी, पोलीस खात्याचे अधिकारी, वाहतूक खात्याचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी तसेच, इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे शासकीय योजनांमध्ये कशाप्रकारे दुजाभाव करुन निधी उपलब्ध करून देत नाहीत तसेच आपल्या सहकार्यांच्या मदतीने योजनेच्या निधीत हेराफेरी करत असल्याचा आरोप केला. तसेच विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला येथील शेतकर्यांचा विरोध राहणार असून, यासंदर्भात उरणचे आ. महेश बालदी यांनी संबंधित खात्याचे मंत्रिमंडळाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली.
उरणकरांना भेडसावणार्या पाणीप्रश्नावर मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करत इतर जनहिताच्या प्रश्नांना अधिकारी वर्ग कशाप्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखवितात हे आमसभेपुढे पटवून देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अॅड. सत्यवान भगत यांना रोखण्याचे काम केले असता. सदर आमसभेप्रसंगी पोलीसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. शिवसेनेचे तालुका संघटक बी.एन. डाकी, कामगार नेते भूषण पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, पंडित घरत, मनिषा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत, रुपेश पाटील, कृष्णा पाटील, माजी सरपंच मधुकर ठाकूर, जयवंत पाटील, मेघनाथ तांडेल, वैजनाथ ठाकूर, प्रफुल्ल खारपाटील, जयेश खारपाटील, धनाजी ठाकूर, संजय ठाकूर, बापू मोकल तसेच तालुक्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसील विभाग, सिडको, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, मत्स्य विभाग, पुरवठा विभाग, शिक्षण विभाग आदींसह इतर संबंधित खात्यांच्या प्रश्नांचा भडीमार आमसभेपुढे केला. यावेळी आमदार महेश बादली यांनीच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सदर नागरिकांना बसण्यास सांगितले. मात्र, नेहमीप्रमाणे याही वर्षी आमसभा तब्बल तीन तास सुरू असताना ही संबंधित खात्याचे अधिकारी हे नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकल्याने नागरिकांनी नैराश्याची भावना व्यक्त करत आमसभेतून आपला काढता पाय घेतला.