वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण

थंड पेये, फळे आणि माठांना वाढली मागणी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यासह परिसरात वाढत्या उष्णतेने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, रणरणत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्म्यापासून बचावासाठी नागरिक झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. तसेच थंड पेये, कलिंगड, काकडी, कोकम यांसारख्या फळांकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.

यंदा वैशाख महिन्यात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेकांना नाईलाजाने घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड आणि गोदामे असल्याने तापमानात आणखी भर पडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
उन्हाळ्यात फ्रिजमधील पाण्यासोबतच मातीच्या माठातील थंडगार पाण्यालाही मोठी पसंती मिळत आहे. माठातील पाण्याची नैसर्गिक चव आणि थंडावा यामुळे बाजारात माठांची मागणी वाढली आहे. मात्र, उरण तालुक्यात फिरत्या राजस्थानी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर माठ विक्री होत असल्याने स्थानिक कुंभारांपुढे स्पर्धेचे आव्हान निर्माण झाले आहे. स्थानिक माठांची किंमत तुलनेने कमी असली तरी विपणन आणि विक्री तंत्राचा अभाव असल्याने या व्यवसायात परप्रांतीय विक्रेते आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version