। माथेरान । वार्ताहर ।
पावसाळा सुरू होताच माथेरान शहराला येथील जीवन प्राधिकरणाकडून गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी माथेरान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून लवकरात लवकर स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा असे लेखी निवेदन मनसेच्या वतीने जीवन प्राधिकरण उपअभियंता अधिकारी कर्जत यांना दि.29 रोजी देण्यात आले.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या संपूर्ण माथेरान शहराला महाराष्ट जीवन प्राधिकरण यांच्या कडून नियमित पाणी पुरवठा केला जातो. माथेरानमध्ये ब्रिटिश काळीन पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर प्लँट आहेत. त्या फिल्टर प्लँटची योग्य दुरुस्ती करून ते पुन्हा व्यवस्थित पूर्ववत करावेत अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली.
देशातील सगळ्यात महाग पाणी दर येथे पाणी बिला मार्फत भरणा करीत आहेत. त्यामुळे इतके महाग पाण्याचे दर असून शहराला येथील जीवन प्राधिकरणमार्फत गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. आणि त्याच बरोबर येथे सक्षम अधिकारी यांची नेमणूक नसल्याने येथील सर्व कर्मचारी वर्ग देखील कामात चालढकल करीत आहे. तसेच मागील महिन्यात येथील बहुतांशी नागरिकांना पाणी दर वाढीव आले होते यासाठी देखील येथे हे वाढीव पाणी दर कमी करून मिळावे यासाठी येथील एम.जी.पी कार्यालयात कोणतेही अधिकारी कार्यरत नव्हते.या सर्वच विषयांची चर्चा देखील जीवन प्राधिकरण कार्यालय कर्जत येथे उपअभियंता अधिकारी ए.पी.कंटे यांच्या बरोबर यावेळी करण्यात आली.
माथेरान मधील अनेक राजकीय पक्ष आप आपल्या राजकीय कामात व्यस्त असताना मनसे मात्र येथील नागरिकांचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यात मग्न आहे. जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर असाच नारा देत बुधवार दि.29 रोजी हे निवेदन देण्यात आले.यावेळी माथेरान मनसे शहर अध्यक्ष संतोष कदम, रविंद्र कदम, असिफ खान तसेच अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.