भूमिगत वीजपुरवठा करणार्या केबलमध्ये बिघाड
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात गेली काही महिने सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांसह लघु उद्योगांना मोठा फटका बसत आहे. भूमिगत वीजपुरवठा करणार्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले असले तरी सातत्याने वीज पुरवठा खंडित का होत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाड तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून खंडित झालेला वीजपुरवठा दुसर्या दिवशी दुपारनंतर देखील पूर्ववत न झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महावितरण विभागाकडून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अंडरग्राउंड असलेल्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास सुरू असून पूर्ववत होण्यास अधिक का लागणार असल्याचेदेखील सांगण्यात आले. महाड एमआयडीसीमध्ये रस्त्याचे काम सुरू असून होत असलेल्या खोदकामामुळे सातत्याने हा बिघाड होत असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे. मात्र, या खोदकाम करणार्या कंपनीवर महावितरण विभाग कारवाई करणार का, असा प्रश्नदेखील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.