330 बेपत्ता व्यक्तींचा शोध
। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलिसांच्यावतीने ऑपरेशन शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी त्यांना गेल्या वर्षभरामध्ये शोध न लागलेल्या 213 महिला, 95 पुरुष, 10 अपहृत मुले, 12 अपहृत मुली अशा एकूण 330 बेपत्ता आणि हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले आहे. या मोहिमेत सापडलेल्या महिला व मुलांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
गेल्या वर्षभरता हरविलेल्या महिलांचा आणि बालकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये ‘ऑपरेशन शोध’ अशी विशेष शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी 17 एप्रिल ते 15 मे या कालावधीत ऑपरेशन शोध मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे स्तरावर एकूण 20 पथके, तर गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील 2 अशी एकूण 22 पथके तयार करण्यात आली होती. या मोहिमेत बेपत्ता होऊन वर्ष उलटून गेल्यानंतर देखील ज्या महिलांचा आणि मुला-मुलींचा शोध लागलेला नाही, अशांची माहिती नव्याने अद्ययावत आणि संकलित करण्यात आली. त्यानंतर त्यांचा नव्याने शोध घेण्यात आला.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी ठाणे, उल्हासनगर आणि कर्जत येथील बाल कल्याण समितीतील बाल निरीक्षणगृहाचे अधीक्षक तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध एनजीओ यांच्याशी समन्वय साधून हरवलेल्यांचा शोध घेतला. या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना 213 महिला, 95 पुरुष, 10 अपहृत मुले, 12 अपहृत मुली अशा एकूण 330 बेपत्ता आणि हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले. या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नवी मुंबईतील हरवलेल्या महिला आणि मुला-मुलींसदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी 103 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.