उप वनसंरक्षक राहूल पाटील यांची संकल्पना
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच नागरिकीकरणामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होऊ लागली आहे. वणवा व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे वनांमधील झाडेदेखील नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. तापमानात दिवसेंदिवस होणारा बदल, बदलते हवामान यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनांमधील झाडे कमी झाल्याने तेथील पशुपक्षांचा रहिवास घटण्याच्या मार्गावर आहे. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग वन विभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील यांच्या संकल्पनेतून ‘माझे वन’ ही योजना वन विभागाने सुरु केली आहे. माझे वन ही संकल्पना रायगड पॅटर्न ठरली असून वृक्षाच्छादन वाढण्यास त्यातून भरीव मदत होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
अलिबाग वन विभागातील अवनत वन क्षेत्राचे शासकीय निधीचा वापर न करता वनीकरण करण्यासाठी ‘माझे वन’ ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणत्याही एक एकर क्षेत्राची निवड करुन पावसाळ्यात, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांना वाटणार्या वृक्षांची लागवड करणार आहेत. निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. माझे वन योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर या वर्षी पावसाळ्यात वनीकरण होणार आहे.
अलिबाग वन विभागात एक उप वन संरक्षक, दोन सहाय्यक वन संरक्षक, 12 वन परिक्षेत्र अधिकारी, 74 परिमंडळ अधिकारी, 248 नियत क्षेत्र अधिकारी असे एकूण 338 क्षेत्रीय पदे कार्यरत आहेत. अलिबाग वन विभागांचे कार्यक्षेत्रात 1 हजार 65.61 चौ. कि. मी इतके वनक्षेत्र आहे. अलिबाग, वडखळ, पेण, पनवेल, उरण, खालापुर, कर्जत पुर्व व पश्चिम, माथेरान, सुधागड व नागोठणे अशी 11 परिक्षेत्र आहेत. या योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार आहे. अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत होणार आहे. वन कर्मचार्यांनी निवड केलेले अवनत एक एकर क्षेत्रास त्यांच्या स्वेच्छेने नाव देण्याची त्यांना मुभा राहणार आहे. माझे वन या योजेनचा शुभारंभ गुरुवारी (दि.22) कर्जत येथील जुमापट्टी (माथेरान परिक्षेत्र) येथील राखीव वन कक्ष क्र. 50 ‘अ’ येथे 1 एकर अवनत क्षेत्रावर वृक्ष रोपण करुन करण्यात आला.
शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. वेगवेगळा निधी उपलब्ध होतो. परंतु, त्यानंतर त्यांची ठोस अंमलबजावणी देखभाल दुरुस्ती राहत नाही. वनांचे महत्व प्रत्येकाला समजले पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक कर्मचार्याने सामाजिक बांधिलकीतून वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्यामुळे माझे वन हा उपक्रम रायगड जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. त्याची सुरुवात केली आहे. हा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविला जाईल, असा विश्वास आहे.
– राहूल पाटील, उपवन संरक्षक, अलिबाग