| मुंबई | प्रतिनिधी |
नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळाली आहे. शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडेच असलेले परंतू, मध्यंतरी धनंजय मुंडेंकडे फिरून आलेले अन्न व नागरी पुरवठा खाते पुन्हा भुजबळ यांच्याकडे आले आहे.
राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. तेव्हापासून ते नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती. यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना जवळ करण्यात आले आहे. खातेवाटप झाल्याचा फोन येताच भुजबळ लगेचच मुंबईला रवाना झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, सरकारी आदेश निघाल्याचे मला आताच कळले. मी लगेचच मुंबईला जात असून पदभार घेत आहे. खात्याच्या सचिव, अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येणार आहे. हे माझेच खाते होते. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे गेले होते. ते पुन्हा माझ्याकडे आले आहे. मी मंत्री असताना शेवटच्या गावापर्यंत, प्रत्येक दुकानात अधान्य पोहोचवले होते, पुढे घोटाळा होऊ नये यासाठी प्रयत्न असणार आहेत, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.