| मुंबई | प्रतिनिधी |
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणा करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक गुरूवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार 24 जूनपासून इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) पुरवणी परीक्षा जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासकमाची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलैदरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जून ते 11 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता बारावी माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने 15 व 16 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीची लेखी आणि प्रात्याक्षिक व तोंडी परीक्षा 24 जून ते 8 जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 24 जून ते 4 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत www mahahsscboard.in या संकेतस्थळावर 22 मे पासून उपलब्ध करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांसदर्भात जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे फक्त विद्यार्थ्यांच्या माहितासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील अंतिम वेळापत्रक हे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून परीक्षेची तयारी करून परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम समाज माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे.