खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड परेश हॉटेल ते एकदरा पुलापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुरूड परेश हॉटेल, तहसीलदार कार्यालय, समुद्रकिनारा, मच्छी मार्केट व एकदरा पुलापर्यंत रस्ता नव्याने बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्य सरकारने निधी मंजूर करुन दिला होता. तद्नंतर या रस्त्याचा कामाचा ठेकाही देण्यात आला होता. परंतु, ठेकेदाराला हा रस्ता नव्याने पावासाच्या आत बनवता आला नाही व पडलेले खड्डेही बुजवता न आल्याने नागरिकांना रस्त्यावर प्रवास करणे कठीण झाले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासंदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही. त्याचप्रमाणे रस्ता वेळेत न बनवणार्‍या ठेकेदारावर कोणतेही कारवाई झालेली दिसून आली नाही. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणातला गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव असतो. हा उत्सव घरोघरी उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव काही दिवसांवर ठेपला तरी रस्त्यावरचे खड्डे जैसे थे आहेत. गेले सहा दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्यास सुरुवात होत नसल्याने नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

निधी येऊनही रस्ता बनत नसेल तर हे दुर्दैव आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, याच रस्त्यावरून हातगाडी, रिक्षा, टेम्पो आदी वाहनांमधून घरोघरी गणपतीचे आगमन होत असते. परंतु, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाहन चालवणे व पायी चालणे कठीण झालं आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ खड्डे बुजवून गणेशभक्तांना दिलासा द्यावा.

मनोहर बैले, चेअरमन,
सागर कन्या मच्छिमार सोसायटी

Exit mobile version