मुंबई गोवा महामार्गावर पेण नजीक प्रवाशांच्या गाडीवर दरोडा : 15 तोळे सोने लुटले

चालत्या गाडीवर दगड मारून लुटमार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई गोवा महामार्गावर दापोलीतून मुंबईकडे जाणार्‍या गाडीवर दुसर्‍या गाडीतील अज्ञात व्यक्तींनी दगड मारून प्रवाशांना मारझोड करून 15 तोळे सोने लुटण्याची घटना पेण शहरा नजीक घडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रशांत प्रकाश मोहिते (वय 41)राहणार नुतननगर बोरीवली (पूर्व) हे आई वडील, बहिण, भाऊ, भाचे व पुतणे यांच्यासह बोलेरो जीप क्र. एमएच-06-एझेड-1451 गाडीने दापोली वरून बोरीवली, मुंबईकडे जात होते.

रात्री 3 वाजण्याच्या सुमारास पेण नजिक हॉटेल साई सहाराच्या आत जात असतना राखाडी रंगाच्या इरटीगा कारने आलेल्या अनोळखी व्यक्तीने यांच्या गाडीच्या काचेवर 02 दगड मारले व शिवीगाळी करत गाडी पुढे नेली. यावेळी प्रशांत मोहिते यांनी गाडी परत वळवून इरटीगा गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना चालत्या गाडीतून दगड का मारला असे विचारले. यावेळी इरटीगा गाडीने मोहीते त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

त्याचवेळी मागून आलेल्या व्होल्कस वेगन कंपनीची वेन्टो गाडी व मारुती सुझुकी स्विफ्ट नं. आरजे-43/ सीए-5155 यातून आलेले 10 ते 15 जणांनी मोहिते व यांच्या कुटुंबाला मारहाण केली. त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने खेचून घेतले. तसेच यांच्या बहिणीचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान मागून आलेल्या काही गाडीतील व्यक्तींनी मारहाण करणार्‍या हटकल्याने ते दरोडेखोर गाडीत बसून पळून गेले. या संदर्भात दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजित गोळे हे करीत आहेत.

Exit mobile version