‘या’ अफवांमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा

एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे

। छ. संभाजीनगर । वृत्तसंस्था ।

छत्रपती संभाजीनगर किराडपुरा भागात राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. यावेळी पोलिसांची अनेक वाहने पेटवून देण्यात आली. तर, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील यात जखमी झाले होते. दरम्यान, एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. केवळ अफवांमुळेच छत्रपती संभाजीनगरमधील राडा झाला असल्याचं तपासात समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अफवाच कारणीभूत असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे. सुरुवातीला दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांनी हा वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावरुन अफवा पसरवल्या आणि त्यामुळे मोठा जमाव जमा झाला. “एका गटाच्या तरुणांना नाहक मारण्यात आले आहे, मारेकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात लपवून ठेवले आहे, शहागंजमध्ये दंगल उसळली आहे,” यासह काही अफवा पसरल्यानेच जमाव जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत.

तर, आतापर्यंत एसआयटीने 79 हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच इतर फरार आरोपींना देखील ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकाकडून कारवाई सुरुच आहे.

Exit mobile version