पिडीत महिला कर्मचार्याने केली पोलिसात तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तहसिलदार कार्यालयात महसूल शाखेतील अव्वल कारकुनाने आपल्या सहकारी महिला कर्मचार्याचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यासदंर्भात पिडीत महिला कर्मचार्याने दोन आठवडयाने केलेल्या तक्रारीनंतर मुरुड पोलिस ठाण्यात या कारकुनावर गुन्हा दाखल करयात आला आहे.
सदरचा प्रकार 18 ऑक्टो. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला. मुरूड तहसिल कार्यालयात पिडीत महिला कर्मचारी कार्यरत आहे. ती कार्यालयीन काम करीत असताना तहसिलदार कार्यालयातील अव्वल कारकून म्हणून महसूल शाखेत असलेला इसम तिथे आला. पिडीत कर्मचारी ही एकटीच असलेली पाहुन आरोपीने तिचे दोन्ही गाल हातात धरून ओढले. त्यावेळी पिडीतेने आरोपीचे दोन्ही हात बाजुला झटकले. त्यावर आरोपीने पिडीताच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
सदर प्रकार घडल्यानंतर संतापलेल्या पिडीतेची इतर कर्मचारी समजूत काढीत तीने तक्रार करु नये म्हणून तिच्यावर दबाव आणत असल्याचे समजते. मात्र अखेर 15 दिवसानंतर सदर पिडीत महिलेने विनयभंग करणार्या अव्वल कारकुनाविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मुरुड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक खुतीजा शेख या करीत आहेत.